मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविली मदत
प्रतिनिधी /बेळगाव
सीमा आंदोलनात हुतात्मा झालेले मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीची पेन्शन मागील सव्वा वर्षांपासून बंद आहे. ती का बंद आहे याचे कारण अद्याप सापडलेले नसले तरी आपली जबाबदारी म्हणून शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. सीमासमन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेन्नाळकर यांच्या पत्नीसाठी 51 हजार रुपये, साडी-चोळी व धान्य पाठवून दिले आहे.
1956 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीला महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन देण्यात येते. परंतु मागील सव्वा वर्षापासून ती जमाच झालेली नसल्याने बँका व महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. यासंदर्भात समिती व शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत पाठवून दिली. तसेच पेन्शनबाबतचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
रविवारी मंगेश चिवटे यांनी कंग्राळी येथे लक्ष्मी बेन्नाळकर यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता जाधव, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, सुनील देसूरकर, विजय सावंत, आर. आय. पाटील, राजू कणेरी, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रशांत पाटील, विनायक कदम, धनंजय तुळसकर, राकेश पाटील, गजानन पाटील, बाबू पावशे, टी.डी. पाटील, मारुती करटे, इंदुमती बेन्नाळकर, जितेश मेणसे, शटूप्पा चव्हाण, संतोष समर्थ यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
‘तरुण भारत’ने केला पाठपुरावा
दै. ‘तरुण भारत’मधून ‘हुतात्म्यांचे वारसदार वर्षभरापासून पेन्शनविना’ असे वृत्त प्रसिद्ध करून वारसदारांच्या व्यथा मांडल्या होत्या. सध्या हुतात्म्यांचे वारसदार वयोवृद्ध असल्याने महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे, असे मांडण्यात आले होते. या वृत्तामुळे शिवसेना व समितीच्या पदाधिकाऱयांनी महाराष्ट्र सीमासमन्वय कक्ष व मंत्र्यांच्या कानावर हे वृत्त घातल्याने वारसदारांना काही प्रमाणात मदत मिळू शकली आहे. त्यामुळे हुतात्म्यांच्या वारसदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे..