टीसी बदलण्यासाठी 65 हजार रुपये घेतली लाच : लोळसूरमध्ये कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
शेतातील ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱयाकडून 65 हजार रुपये लाच स्वीकारताना लोळसूर (ता. गोकाक) येथील हेस्कॉमच्या दोन अधिकाऱयांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एसीबीच्या अधिकाऱयांनी अचानक छापा टाकून ही कारवाई केली आहे.
लोळसूर येथील सेक्शन ऑफीसर प्रकाश विरुपाक्ष परीट व सुपरवायझर मल्लय्या कुमारस्वामी हिरेमठ या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. अरभांवी येथील आनंद उद्दाप्पा धर्मट्टी या शेतकऱयाने दिलेल्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
एसीबीचे पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा, पोलीस उपअधीक्षक एल. वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एच. सुनीलकुमार, ए. एस. गुदीगोप्प व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे.
प्रकाश हा कुरणेवाडी (ता. हुक्केरी) येथील राहणारा असून मल्लय्या हा महालिंगेश्वर गोकाकचा रहिवासी आहे.
शेतकऱयाची एसीबीकडे तक्रार
अरभांवी येथे शेत जमिनीत असलेला ट्रान्स्फॉर्मर वारंवार नादुरुस्त होत होता. ते बदलण्यासाठी आनंद धर्मट्टी यांनी हेस्कॉमकडे विनंती केली होती. मात्र सेक्शन ऑफीसर व सुपरवायझरनी त्यासाठी 65 हजार रुपयांची लाच मागताच त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.