4 हजार कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी हुंडाईने चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी 2028पर्यंत भारतामध्ये आपल्या नव्या 6 इलेक्ट्रिक वाहनांना दाखल करू शकणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक गटामध्ये मिश्र प्रकारांमध्ये कार्स लाँच करण्याची योजना कंपनीने आखली असून जागतिक प्लॅटफॉर्म ‘जीएमपी’च्या माध्यमातून पुढील काही वर्षांमध्ये आपल्या नवीन वाहनांना सादर केले जाणार असल्याचेही हुंडाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ एस. एस. कीम यांनी म्हटले आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायाला देशात अधिक गती देण्याचाही विचार केला असून या अंतर्गतच नव्या कार्स लाँच केल्या जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यादृष्टीने प्रयत्नांनाही प्रारंभ झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीचा विचार करूनच कंपनीने ग्राहकांसाठी नव्या इलेक्ट्रिक वाहनांची घोषणा केली आहे. नव्या वाहनांच्या निर्मितीवेळी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत व कल्पकता यांचाही विचार प्राधान्याने केला जाणार आहे.