राजेश जाधव/ चिपळूण
लहानपणीच हरपलेले वडिलांचे छत्र, त्यामुळे घरात आलेले अठराविश्व दारिद्रय़, पडलेले घर, घरात नसलेली विजेची व्यवस्था तरीही अभ्यासाठी जुनेच घर भाडय़ाने घेऊन इतरांची धुणीभांडी करून आईला मदत करत शिरगाव येथील निलम धांगडे या विद्यार्थिनीने दहावी इयत्तेत 73.40 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या हुशारीला बळ देण्यासाठी प्रांत कार्यालयातील जबाबी लिपिक प्रकाश सावंत यांनी गेल्या 3 वर्षांपासून तिच्यासह तिच्या लहान बहिणीच्या शिक्षणाची जबाबदरी स्वीकारली आहे.
शिरगाव-धांगडेवाडी येथील धांगडे हे गरीब कुटुंब. असे असतानाच काही वर्षापूर्वी घरातील कर्ता पुरूष नियतीने हिरावून नेला. त्यामुळे या गरिबीत आणखीनच भर पडली. निलमची आई इतरांची धुणीभांडी करून तिच्यासह लहान बहिणीचा सांभाळ करीत आहे. मात्र याच गरिबीतून त्यांचे स्वत:चे घर पडले. या घरात आजही साधी वीजही नाही. मात्र निलम व तिची लहान बहीण खूप उशीर आहेत. निलम शिरगाव हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होती. विजेअभावी दहावीचा अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न तिच्यासमोर होता. त्यामुळे तिच्या आईने दुसरे जुने घर भाडय़ाने घेतले. येथे विजेची व्यवस्था असल्याने निलम आपला अभ्यास करीत होती.
एकीकडे यश मिळवण्यासाठी अभ्यास महत्वाचा असतानाच दुसरीकडे आईला मदत करणेही तितकेच महत्वाचे होते. त्यामुळे तीही धुणीभांडी करीत आहे. याच कष्टातून शिक्षण घेताना तिने 73.40 टक्के गुण मिळवून आपल्या हुशारीची चुणूक दाखवून दिली आहे. तिची लहान बहीण सातवी इयत्तेत असून तीही अशीच हुशार आहे. आता निलम विज्ञान शाखेतून पुढील शिक्षण करून त्यानंतर नेमके काय करायचे, हे ठरवणार आहे. या यशाचे श्रेय शिक्षक, आई, बहीण, प्रकाश सावंत यांच्यासह अन्य नातेवाईकांना असल्याचे तिने सांगितले.
..अन् सावंत यांनी उचलली जबाबदारी
येथील प्रांत कार्यालयात जबाबी लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश सावंत हे स्वत: व पाग येथील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कायम सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. निलम व तिची बहीण अभ्यासात हुशार आहेत. मात्र परिस्थितीअभावी त्यांना शिक्षण घेणे कठीण आहे, असे त्यांना समजले. त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून सावंत या दोघींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना जितके शिकायचे आहे तिथपर्यंतचा खर्च आपण करणार असून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.