लस घेणारी देशातील सर्वात वयोवृद्ध महिला
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरच्या बन्नेरघट्टा रोडवर अपोलो इस्पितळात 103 वर्षीय वृद्धेने बुधवारी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. देशात आतापर्यंत लस घेणाऱयांपैकी त्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याच्या अभियानाला प्रारंभ झाला आहे.
याआधी 102 वर्षांचे निवृत्त सैन्य अधिकारी सुब्रह्मण्य के. एन. यांनी लस घेत लस घेणारे देशातील सर्वात वृद्ध व्यक्ती हा मान मिळविला होता.
बुधवारी कामेश्वरी यांच्यासमवेत त्यांचा 77 वर्षीय मुलगा प्रसाद राव यांनी देखील कोविड लस घेतली. कामेश्वरी यांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. लस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. कर्नाटकात आतापर्यंत 1,37,548 ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक कोणतीही भीती न बाळगता लस घेण्यासाठी पुढे येत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.