मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था
दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको या देशातील कुडॅड झुरेज या सीमावर्ती शहरात झालेल्या भीषण टोळीयुद्धात 11 जणांचा बळी गेला आहे. या शहरात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती स्थानिक प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याची माहिती देण्यात आली. दोन टोळय़ांनी स्थानिक रेडिओ स्टेशनवर हल्ला करुन आणखी 9 जणांची हत्या केल्याचेही वृत्त आहे.
झुरेज हे सीमावर्ती शहर असून तेथून मोठय़ा प्रमाणात अंमली पदार्थांचा व्यापार चालतो. हे अंमली पदार्थ अमेरिका आणि इतर देशांमध्ये बेकायदेशीररित्या पाठविले जातात. त्यांची विक्री करुन कोटय़वधींची कमाई करणारे स्थानिक धनिक आपल्या या बेकायदेशीर व्यवसायाच्या संरक्षणासाठी सशस्त्र टोळय़ा बाळगतात. काही वेळा या टोळय़ांमध्ये संघर्ष उद्भवून मोठय़ा प्रमाणात हिंसाचार होतो. 2010 पासून अशा टोळीयुद्धांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. ताज्या हिंसाचाराचा प्रारंभ या शहरातील एका कारागृहात झाला. त्यानंतर हिंसाचार शहरांमधील रस्त्यारस्त्यांवर पसरला. स्थानिक नागरीकांनी जीव मुठीत धरुन घरांमध्येच राहण्याचा प्राधान्य दिले. परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली असून हिंसाचाराला भडका केव्हाही उडू शकतो, असा इशारा स्थानिक पोलिसांनी दिल्याचे सांगण्यात आले.
सर्वसामान्यांवर हल्ले
शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात सर्वसामान्य नागरीकांनाही लक्ष्य करण्यात आले होते. दोन प्रतिस्पर्धी टोळय़ांच्या हल्लेखोरांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात काही निरपराध नागरीक ठार झाले. एका टोळीने स्थानिक दुकानांवर आणि व्यापारी केंद्रावर हल्ले चढविले. मोठय़ा प्रमाणात जाळपोळ आणि लुटालूटही करण्यात आली. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून टोळीग्रस्त भागांमध्ये पहारा वाढविण्यात आला आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे.