प्रतिनिधी/ सातारा
चिंचणेर वंदनच्या पोलीस पाटील चंद्रकांत तुकाराम बर्गे (वय 47) याने एका अदाखलपात्र गुन्हय़ात मदत करण्यासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच मागितली. यात तडजोड होऊन 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
माजी सैनिकांची गावे म्हणून ओळखल्या जाणाऱया चिंचणेर वंदन आणि चिंचणेर निंब या दोन्ही गावाला चंद्रकांत तुकाराम बर्गे हे पोलीस पाटील म्हणून काम करतात. त्यांनी गावातील एका अदाखलपात्र गुह्यात अडकलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खाजगीत 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. यावर चर्चेअंती 15 हजार रुपये घेऊन चंद्रकांत बर्गे हे मदत करण्यास तयार झाले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून याप्रकरणी मदत मागितली. यावरून पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस अंमलदार प्रशांत ताटे, विशाल खरात, संभाजी काटकर यांनी सोमवार दि. 27 रोजी सापळा लावला. आणि आरोपी चंद्रकांत बर्गे यांना तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.