मशीन गन, एके-47 हस्तगत
वृत्तसंस्था/ सॅक्रामेंटो
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील एका गुरुद्वारामध्ये मागील महिन्यात गोळीबाराची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर छापे टाकले आहेत. या प्रकरणी 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी छाप्यांदरम्यान एके-47, मशीनगन आणि अनेक हँडगन्स हस्तगत केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बहुतांश जण शीख समुदायाशी संबंधित आहेत. कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल रॉब बोंटा, यूबा शहराचे पोलीस प्रमुख ब्रायन बेकर, सटर काउंटीच्या ऍटर्नी जेनिफर डुप्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते भारतात हत्येप्रकरणी वाँटेड होते.
या आरोपींवर कॅलिफोर्नियाच्या सटर, सॅक्रामेंटो, सॅन वॉकिन, सोलानो, योलो आणि मर्स काउंटीमध्ये हिंसा, गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नांचा आरोप आहे. स्टॉकटन येथील एका गुरुद्वारामध्येही या आरोपींनी गोळीबार केला होता. मागील वर्षी 27 ऑगस्ट रोजी गोळीबाराची घटना घडली होती. तर 23 मार्च रोजी कॅलिफोर्नियातील गुरुद्वारामध्ये गोळीबार झाला होता.