कोरोनाचे जगभरात 318378 रुग्ण : 100 कोटी लोक घरांमध्ये कैद
युरोपीय देशांमध्ये स्थिती अद्याप बिकट, इराणमध्ये सुधारणा
वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 318378 वर पोहोचली आहे. तर 13671 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रविवारी सुमारे 1 अब्ज लोक घरांमध्येच कैद राहिले आहेत. सर्वात बिकट स्थिती असलेल्या इटलीतील कारखाने बंद करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत 96010 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कोरोनाचा संसर्ग दूर करण्याच्या वैद्यकीय उपाययोजनांना यश मिळू लागले आहे. दिवसेंदिवस समोर येणाऱया नव्या माहितीमुळे उपचार प्रक्रियेत मोठी सुधारणा होऊ लागली असून आहे. या महामारीमुळे जगातील 35 देशांनी टाळेबंदी लागू केल्याने जनजीवन, प्रवास आणि व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. तर आंतरराष्ट्रीय सीमा करण्यासाठी विविध देशांनी प्रयत्न चालविला असून विषाणूमुळे येऊ घातलेल्या आर्थिक मंदीपासून वाचण्यासाठी आपत्कालीन उपाययोजनांकरता अब्जावधी डॉलर्स गुंतविण्याचे पाऊल उचलले असून यातून बाजाराला दिलासा मिळू शकतो.
इटलीत बिकट स्थिती कायम
इटलीतील स्थिती अद्याप गंभीर असून तेथे 4825 जणांना जीव गमवावा लागला आहे. जगभरातील एकूण बळींच्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीयांश इतके आहे. पंतप्रधान जिएसेपे कॉन्टे यांनी शनिवारी रात्री उशिरा देशवासीयांना संबोधित करत अनावश्यक कारखाने बंद करण्याची घोषणा केली आहे. 6 कोटी लोकसंख्या असलेला इटली देश आता चीननंतर कोरोनाचा नवा केंद्रबिंदू ठरला आहे. इटलीतील कोरोनाचा मृत्यूदर 8.6 टक्के असून तो अन्य देशांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. इटलीचा माजी फूटबॉलटपटू पाओलो माल्दिनी आणि त्यांचा पुत्र या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माल्दिनी यांना जगातील सर्वोत्तम डिफेंडरपैकी एक मानले जाते. 51 वर्षीय माल्दिनी सध्या एसी मिलानचे तांत्रिक सहाय्यक आहेत.
फ्रान्समध्ये 562 बळी
कोरोनामुळे फ्रान्समध्ये जीव गमाविणाऱयांची संख्या 562 वर पोहोचली आहे. तर एकूण रुग्णसंख्या 14459 झाली आहे. लोकांना घरातून बाहेर पडू न देण्यासाठी सरकारने आता हेलिकॉप्टर आणि ड्रोन्सची मदत घेतली आहे. पॅरिससह अन्य शहरांमध्ये पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
चीनमध्ये 4 दिवसांनी नवा रुग्ण
चीनमध्ये 4 दिवसांनी पहिला देशांतर्गत रुग्ण सापडला आहे. चीनने शांघाय विमानतळावर येणाऱया प्रत्येक प्रवाशाच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. संबंधित प्रवाशाच्या रक्ताचे नमुने देखील घेतले जाणार आहेत.
कुवेत सरकार कठोर
कुवेत सरकारने काही दिवसांपूर्वी लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला होता. पण याचा कुठलाच प्रभाव दिसून न आल्याने सरकार आता कठोर पावले उचलणार असल्याचे उपपंतप्रधान अनस अल सालेह यांनी सांगितले आहे. रविवारी 11 तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ब्रिटनमध्ये धक्कादायक प्रकार
निम्मे जग कोरोनाच्या भीतीने स्वतःच्या घरात कैद असताना डॉक्टर आणि परिचारिका स्वतःचा जीव जोखिमीत घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु त्यांच्या या दिवसरात्र मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱयांची संख्याही कमी नाही. कोविड-19च्या रुग्णांवर उपचार करणाऱया ब्रिटनमधील परिचारिकांना लोकांकडून आदराऐवजी शिव्या पत्कराव्या लागत आहेत. लोक या परिचारिकांनाच ‘आजार फैलावणाऱया’ ठरवत आहेत. ब्रिटनमध्ये अतापर्यंत कोरोनाचे 5018 रुग्ण सापडले असून 233 जणांनी जीव गमावला आहे.
पाकमध्ये कोरोनाचा कहर
पाकिस्तानात रुग्णांची संख्या 645 झाली असून 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. सिंध प्रांत कोरोना संसर्गाचा नवा केंद्रबिंदू ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. तेथे सर्वाधिक 292 रुग्ण आढळून आले आहेत. स्थिती हाताबाहेर गेल्याने तेथे सैन्याला पाचारण करावे लागले आहे. पाकिस्तानात संसर्गाचा हाच वेग कायम राहिल्यास जून महिन्यापर्यंत 2 कोटी लोकांना याची लागण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
देश रुग्ण बळी
- चीन……….. 81054 3621
- इटली………. 53578 4825
- स्पेन……….. 28572 1725
- अमेरिका…… 26909 349
- जर्मनी……… 23937 93
- इराण………. 21638 1685
- फ्रान्स………. 14459 562
- दक्षिण कोरिया…. 8897 104
- स्वीत्झर्लंड…. 7225. 80
- ब्रिटन………. 5018. 233
- नेदरलँड……. 3631. 136
- बेल्जियम….. 3401. 75
- ऑस्ट्रिया…… 3024. 08
- नॉर्वे………… 2226. 07
- स्वीडन…….. 1770. 20
- कॅनडा……… 1328. 19
- डेन्मार्क…….. 1326. 13
- ऑस्ट्रेलिया… 1286. 07
- पोर्तुगाल…… 1280. 12
- मलेशिया….. 1183. 09
- ब्राझील……. 1178. 18
- जपान……… 1054. 36