पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात येत्या 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळण्याचे निश्चित केले असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले आहे.
राज्यसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रधान यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळापासून सुरु आहे. परंतु त्यांच्यानंतर आलेल्या सरकारांनी या योजनेवर म्हणावे तसे लक्ष दिले नसल्याचे मंत्री प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.
वर्ष 2014 मध्ये आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण फक्त 0.67 टक्क्यांवर होते. ज्याचे मूल्य 500 कोटी रुपयांपेक्षाही कमी राहिले होते. वर्ष 2020-21 मध्ये वाढीसह 8.5 टक्क्यांवर राहिले असून यांचे मूल्य 18,000 कोटी रुपये आहे. वर्ष 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्के करणार असल्याचे संकेत त्यांनी व्यक्त केले आहेत.
ऊसासह अन्य घटकांचाही समावेश
आतापर्यंत फक्त ऊसापासूनच इथेनॉलची निर्मिती केली जात असे परंतु आता तांदूळ आणि मक्का यांचाही इथेनॉल निर्मितीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कारण सदरच्या दोन्ही पिकांचे उत्पादन हे अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात होत असल्याचे मंत्री प्रधान यांनी नमूद केले आहे.