11 वर्षांच्या कालावधीत 3 ग्रँडस्लॅम विजेतेपदावर शिक्कामोर्तब, सलग 114 आठवडे अव्वलस्थानी असताना निवृत्तीचा निर्णय
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद संपादन करणारी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू ऍश बार्टी हिने अवघ्या 25 व्या वर्षीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत 3 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी ऍश बार्टी सलग 114 आठवडे जागतिक मानांकनात अव्वलस्थानी विराजमान होती. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या सहा मिनिटांच्या व्हीडिओच्या माध्यमातून तिने आपली निवृत्ती जाहीर केली. ऍश बार्टीचा गेल्या नोव्हेंबरमध्ये ट्रेनी व्यावसायिक गोल्फपटू गॅरी किस्सिक याच्याशी वाङ्निश्चय झाला आहे.
‘मला माझ्या अन्य ध्येय, स्वप्नांचा आता पाठपुरावा करायचा आहे. यापुढील आयुष्य मी ऍथलिट म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून व्यतित करेन’, असे बार्टी भावूक होत म्हणाली.
अर्थात, बार्टीने टेनिसमधून ब्रेक घेण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. 2011 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी ती विम्बल्डन ज्युनियर चॅम्पियन होती. त्यानंतर 2014 मध्ये तिने अचानक 2 वर्षे पूर्ण हंगामातून ब्रेक घेतला. सातत्याने होणारी दमछाक, प्रचंड दडपण आणि प्रवास करावा लागत असल्याने आपण खेळू शकत नसल्याचे तिने त्यावेळी जाहीर केले होते. नंतर ती काही काळ व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळली आणि नंतर पुन्हा टेनिसकडे वळली होती.
ऍश बार्टीने जिंकलेली तिन्ही मेजर चॅम्पियनशिप ही विभिन्न सरफेसवरील आहे, हे विशेष. तिने क्ले कोर्टवर 2019 प्रेंच ओपन, ग्रास कोर्टवर गतवर्षी विम्बल्डन व हार्ड कोर्टवर यंदा मेलबर्न पार्कवर विजेतेपद संपादन केले. मायभूमीत ग्रँडस्लॅम जिंकणारी ती 44 वर्षातील पहिलीच ऑस्ट्रेलियन खेळाडू देखील ठरली. सातवेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱया इव्हॉन कॉलीच्या हस्ते बार्टीला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम प्रदान करण्यात आला. त्यावेळी बार्टीने अंतिम लढतीत डॅनिएले कॉलिन्सचा धुव्वा उडवला. मात्र, नंतर आश्चर्य म्हणजे बार्टीने एकही स्पर्धा खेळलेली नाही.
बार्टी अलीकडील कालावधीत विशेष बहरात होती. तिने मागील 26 पैकी 25 सामने आणि 4 पैकी 3 स्पर्धा जिंकत आपला बहारदार फॉर्म दाखवून दिला. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तिने एकेरीत 15 टूर लेव्हल जेतेपदे आणि दुहेरीत 12 जेतेपदांवर आपली मोहोर उमटवली. ही दिग्गज, युवा खेळाडू तब्बल 121 आठवडे मानांकनात अव्वलस्थानी विराजमान राहिली. शिवाय, सलग 114 आठवडे तिने अव्वलमानांकन कायम राखले. यापूर्वी, जस्टीन हेनिनने 2008 मध्ये पहिल्या क्रमांकावर असताना निवृत्ती जाहीर केली होती.
ऍश पुन्हा क्रिकेटकडे वळणार का?
ऍश बार्टी हिने ऑस्ट्रेलियातर्फे केवळ टेनिस नव्हे तर क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले असून टेनिसला अलविदा केल्यानंतर ती आता पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळणार का, याची उत्सुकता असेल. टेनिसमधून 21 महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर बार्टीने महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हिट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते.