कोरोना कृती दलाच्या बैठकीत निर्णय : शिकवणी ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन घ्या,लग्न, इतर सोहळय़ांवरही येणार कडक निर्बंध,आज किंवा उद्यापासून होणार अंमलबजावणी
प्रतिनिधी /पणजी
येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातील शाळा, कॉलेज बंद करून रात्री 11 ते सकाळी 6 वा. पर्यंत संचारबंदी लागू करण्याची शिफारस कोरोनाच्या कृती दलाने (टास्क फोर्स) सरकारला केली आहे. सरकारतर्फे या संदर्भात लवकरच आदेश जारी होणार असल्याचे सांगण्यात आले. शिकवणी वर्ग ऑनलाईन घ्यावेत आणि सध्या चालू असलेल्या परीक्षा प्रत्यक्ष हजेरीत (ऑफलाईन) घेण्यात याव्यात अशी सूचनाही सदर समितीने केली आहे.
समितीचे प्रमुख सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी वरील माहिती देऊन सांगितले की, दहावी, अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे (15 ते 18 वर्षे) लसीकरण सुरू झाले असून त्यांनी फक्त लस घेण्यापुरते शाळेत जावे आणि नंतर शाळेत येऊ नये, घरीच रहावे. त्यांनी 26 जानेवारीपर्यंत शाळेत जाऊ नये, असेही समितीने सुचित केले आहे.
संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आवश्यक
कोरोना संसर्गाचा दर वाढल्यामुळे तो रोखण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्याकरीता हे निर्बंध जारी करणे गरजेचे बनले आहे. निर्बंध लागू केल्यानंतर येणारे एक दोन आठवडे महत्त्वाचे ठरणार असून त्यात कोरोना काय करतो ते दिसून येणार आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन हा अवतार (व्हेरियंट) तेवढा धोकादायक नाही, रुग्ण बरे होत आहेत आणि त्यांना हॉस्पिटलात नेण्याची पाळी येत नाही. गेल्या आठवडाभरात संसर्ग वाढला असला तरी बळी 4 गेल्याने मृत्यू नियंत्रणात असल्याचा दावा डॉ. साळकर यांनी केला आहे.
बंद दाराआड होणारे लग्न व इतर सोहळे यावरही काही निर्बंध लादले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. येत्या 10 जानेवारीपर्यंत बुस्टर डोस देण्यात येणार असून 26 जानेवारीपूर्वी दोन दिवस आधी कोरोनाची एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.