कुपवाड पोलीस ठाण्यात 30 हजाराच्या लाच मागणीचा गुन्हा दाखल; अभियंता मकानदारने स्वीकारली नाही लाच
सांगली प्रतिनिधी
दोन प्लॉटचे एकत्रीकरण व त्या प्लॉटवर बांधकाम परवाना देण्यासाठी महापालिकेच्या कुपवाड येथील नगररचना विभागातील शाखा अभियंता अल्ताफ मकबूल मकानदार (44, रा. अल्फोन्सा स्कूल जवळ, मिरज, ता. मिरज जि. सांगली) यांच्या विरुध्द 30 हजार रूपयाची लाच मागणीबाबत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. मकानदार यांना लाचेचा सापळा लावल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ही लाच स्वीकारली नाही. तो गायब झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फक्त लाच मागणीचा गुन्हा कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार याने दोन प्लॉटचे एकत्रीकरण व त्या प्लॉटवर बांधकाम परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. या दोन्ही कामा संदर्भातील वेगवेगळ्या दोन्ही फाईल्स कुपवाड येथील बांधकाम विभागात जमा केल्या आहेत. सदरचे काम तात्काळ पूर्ण करून देण्यासाठी कुपवाड येथील शाखा अभियंता अल्ताफ मकानदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्याची तक्रार त्याने सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणीही करण्यात आली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी कारवाईमध्ये कुपवाड येथे दिलेल्या बांधकाम परवान्याचे काम करून देण्यासाठी अल्ताफ मकानदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रूपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेले होते.
शाखा अभियंता मकानदार यांची पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये मकानदार यांनी तक्रारदार यांचेशी नवीन कामासंदर्भात चर्चा करून जुने काम करून दिल्याबाबत प्रथम 40 हजार रूपये व चर्चे अंती 30 हजार रूपये लाच मागणी केली. त्यानुसार त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. पण मकानदार यांना तक्रारदार यांच्यावर शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून कोणतीही लाच स्वीकारली नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात फक्त लाच मागणीचा गुन्हा कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सुजय घाटगे, तत्कालीन पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे तसेच संजय भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, सिमा माने, भास्कर भोरे, प्रितम चौगुले, धनंजय खाडे, राधिका माने, रविंद्र धुमाळ, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.
अल्ताफ मकानदार याच्या कार्यपध्दतीवर अनेकजण नाराज
शाखा अभियंता अल्ताफ मकानदार यांची कामाची पध्दत आणि त्यांची कार्यपध्दती याबाबत अनेकवेळा नागरिकांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नगरसेवकांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार त्यांना समज दिली होती. पण त्यांनी आपल्या कार्यपध्दतीत बदल केला नव्हता. त्यामुळे त्यांना लाच मागणीच्या गुन्हय़ात ते अडकणार अशी चर्चा होती आणि त्यामध्ये ते अलगदपणे अडकले.