कंपनीची अट मान्य करणार केंद्र सरकार- लसीसाठी धडपड
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी चालू वर्षा लसीचे डोस पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. पण फायजरकडून भारताला लसीचे डोस मिळण्याची शक्यता अद्याप कायम आहे. भारतला लस देण्यापूर्वी फायजर कंपनी काही नियमांमध्ये सूट इच्छित आहे. सरकार यापूर्वी ही अट मान्य करण्यास तयार नव्हते.
सरकार आता फायजरची अट मानण्यास तयार झाले आहे. विदेशमंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. ते फायजर कंपनीच्या संपर्कात आहेत. कुठल्याही क्षणी फायजर आणि भारत सरकार यांच्यातील लसविषयक कराराची घोषणा होऊ शकते.
लसीचा दुष्परिणाम झाल्यावर कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ नये असे फायजरची मागणी आहे. जगभरात 15 कोटी लोकांना फायजरची लस देण्यात आली आहे. अशा स्थितीत गंभीर दुष्परिणामाच्या घटना अद्याप समोर आलेली नाही. ब्रिटनसह 116 देशांनी फायजरला नियमांमध्ये सूट दिली आहे.
हे पाहता भारत सरकारही सूट देण्यास तयार आहे. करार झाल्यास फायजर पुढील 4 महिन्यांमध्ये एकूण 4 कोटी डोस भारताला पुरविण्याच्या तयारीत आहे. जुलै-ऑगस्टमध्ये प्रत्येकी 1 कोटी डोस, 2 कोटी डोस सप्टेंबरमध्ये आणि 1 कोटी डोस ऑक्टोबर महिन्यात भारताला मिळू शकतात.
केंद्रीय कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत देशातील लसीच्या स्थितीचा तपशील मांडण्यात आला. मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लस चालू वर्षात मिळणे जवळपास दुरापास्त आहे. दुसरीकडे जॉन्सन अँड जॉन्सनचे पुढील एक वर्षापर्यंत तयार होणारे सर्व डोस जगभरातील देशांनी बुक करून ठेवले आहेत.
जॉन्सन अँड जॉन्सनचे 100 कोटी डोस भारतातच तयार होणार आहेत, पण हे डोस विदेशात जाणार आहेत. याचमुळे विदेश मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीकडून भारतात तयार होणाऱया जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचे काही डोस भारताला मिळावेत असा प्रयत्न केला जात आहे.
मॉडर्नाचे 5 कोटी डोस पुढील वर्षी
मॉडर्ना 2022 पर्यंत भारतात केवळ एक डोस असलेली लस सादर करण्याच्या तयारीत आहे. याकरता सिप्लाने 2022 मध्ये मॉडर्नाकडून 5 कोटी डोस खरेदी करण्याचा करार केला आहे. मॉडर्ना आगामी काळात भारत सरकारकडे अर्ज करणार आहे.
बायोलॉजिकल ईने मागितली मदत
भारतीय कंपनी बायोलॉजिकल ईने लसीचा कच्चा माल आयात करावा लागत असून तो अत्यंत महाग झाल्याचे म्हणत आर्थिक मदत हवी असल्याचे सांगितले आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 30 कोटी डोस तयार करण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे.