वृत्तसंस्था/ भोपाळ
65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हरियानाचा नेमबाज अनिश भनवालाने एकूण 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत स्वतःचाच यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला आहे.
या स्पर्धेत रेल्वेचा नेमबाज अखिल शेरॉन तसेच कर्नाटकाची युक्ती राजेंद्र यांनी अनुक्रमे पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन तसेच महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदकांची कमाई केली. सदर स्पर्धा भोपाळमध्ये खेळविली जात आहे. हरियानाच्या अनिश भनवालाने पुरुष आणि कनि÷ पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत आपल्या संघाला सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत अनिशने 590 गुण नोंदवित यापूर्वी स्वतःचाच नोंदविलेला 588 गुणांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. अनिशने यापूर्वीचा हा राष्ट्रीय विक्रम 2019 च्या दिल्लीत झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत नोंदविला होता.
केरळमधील थिरुवनंतपुरम येथे शनिवारी राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धा समाप्त झाली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रेल्वेचे नेमबाज अखिल शेरॉनने आपला सहकारी स्वप्निल सुरेश कुसाळेचा 16-6 असा पराभव करून सुवर्णपदक मिळविले. स्वप्निलला रौप्यपदक तर मध्यप्रदेशच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत कर्नाटकाची नेमबाज युक्ती राजेंद्रने गौतमी भानौतचा 17-11 पराभव करत सुवर्णपदक घेतले. भानौतला रौप्यपदक तर ऑलिम्पियन नेमबाज इलावेनिल वलरिवनला कांस्यपदक मिळाले.