वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील रविवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान लंकेने पाकविरुद्ध खेळताना 40 धावांची आघाडी घेतली आहे. पाकच्या पहिल्या डावात लंकेच्या प्रभात जयसूर्याने 5 गडी बाद केले असून पाकच्या कर्णधार बाबर आझमने शानदार शतक झळकविले.
या सामन्यात पाकने 2 बाद 24 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 90.5 षटकात 218 धावांत आटोपला. जयसूर्या तसेच महेश तिक्षणा आणि रमेश मेंडीस यांच्या अचूक गोलंदाजीसमोर कर्णधार बाबर आझम वगळता पाकचे इतर फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यांच्या इतर फलंदाजांना 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. बाबर आझमने 244 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 119 धावा जमविल्याने पाकला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. तो शेवटच्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. पाकतर्फे मोहम्मद रिझवानने 3 चौकारांसह 19, यासिर शहाने 1 चौकारासह 18, हसन अलीने 2 षटकारांसह 17, अब्दुल शफिकने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. बाबर आझम आणि नसिम शहा यांनी शेवटच्या गडय़ासाठी 70 धावांची भर घातली. लंकेच्या जयसूर्याने 82 धावांत 5 तर महेश तिक्षणा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 2 तसेच रजिताने 1 गडी बाद केला. लंकेने पहिल्या डावात पाकवर नाममात्र 4 धावांची आघाडी मिळविली. दिवसअखेर लंकेने दुसऱया डावात 11.5 षटकात 1 बाद 36 धावा जमवित पाकवर एकूण 40 धावांची बढत मिळविली आहे. कर्णधार करुणारत्ने 2 चौकारांसह 16 धावांवर बाद झाला. ओsशादा फर्नांडो 3 चौकारांसह 17 तर रजिता 3 धावांवर खेळत आहेत. पाकच्या मोहम्मद नवाजने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव ः 66.1 षटकात सर्वबाद 222, पाक प. डाव ः 90.5 षटकात सर्वबाद 218 (बाबर अझम 119, रिझवान 19, यासिर शहा 18, हसन अली 17, प्रभात जयसूर्या 5-82, रमेश मेंडीस 2-18, महेश तिक्षणा 2-68, रजिता 1-42), लंका दु. डाव ः 11.5 षटकात 1 बाद 36 (ओशादा फर्नांडो खेळत आहे 17, करुणारत्ने 16, रजिता खेळत आहे 3, मोहम्मद नवाज 1-12).