बँक-आर्थिक कंपन्या, रियल्टीसह वाहन कंपन्यांमध्ये मोठी तेजी
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात शेअर बाजारात दुसऱया दिवशी मंगळवारी मुंबई शेअर बाजाराने नवीन विक्रम नोंदवला आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक कंपन्या, रियल्टी आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील मजबूत लिलावाचा लाभ भारतीय भांडवली बाजाराला (बीएसई) झाल्याचे पहावयास मिळाले आहे. मंगळवारी दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्सने 446 अंकांचा उच्चांक गाठला होता.
दिवसभरातील व्यवहारादरम्यान डॉलरच्या तुलनेत मंगळवारी रुपया मजबूत झाल्याने शेअर बाजाराला तेजीचा प्रवास करणे सोपे झाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 445.87 अंकांनी वधारुन निर्देशांक विक्रम नोंदवत 44,523.02 अंकांवर बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्सने 44,601.63 अंकांचाही टप्पा गाठला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 128.70 अंकांच्या मजबुतीने 13,055.15 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत मंगळवारी सेन्सेक्समधील ऍक्सिस बँक सर्वाधिक म्हणजे 4 टक्क्यांनी नफा कमाईत राहिली होती. सोबत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, कोटक बँक तसेच सन फार्माचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी, टायटन, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, ओएनजीसी आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
भारतीय शेअर बाजाराकडे उपलब्ध असणाऱया आकडेवारीनुसार विदेशी संस्थांची गुंतवणूक ही निव्वळ लिलावात राहिली आहे. यामध्ये सोमवारी 4,738.44 कोटी रुपये मूल्य असणाऱया समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी केली आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी मजबूत होत 74.01 वर बंद झाला असून सदर घडामोडींचा फायदा सेन्सेक्सला झाल्याचे सांगितले जाते. आशियातील हाँगकाँग आणि सोल हे नफ्यात राहिले आहेत. शांघाय नुकसानीत राहिला आहे. युरोपातील प्रमुख बाजारातील कल मात्र मिळताजुळता राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.