महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या ब्रिटिशकालीन ग्लेन ओगल धरण (Glen Ogle Dam) सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत 2.0 योजनेतून तब्बल 7 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. ग्लेन ओगल धरण हे वेण्णालेक नंतरचे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण बनेल, असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
महाबळेश्वर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी इंग्रजांनी वेण्णा धरणास पर्यायी व्यवस्था म्हणून ग्लेन ओगल हे छोटे धरण बांधले. या धरणाची दीड हजार क्युबिक मीटर इतकी पाणी साठवण क्षमता असून, या धरणामधून आजही शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो. हे पाणी महाबळेश्वर वासियांना चार महिने पुरते हे धरण जुने झाल्याने या धरणास गळती लागली असून, धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ साठलेला आहे. याचा पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे या धरणाचे संवर्धन करण्याची मागणी शहरातून होत होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी राज्य व केंद्र शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला होता. केवळ प्रस्ताव पाठवून न थांबता या प्रस्तावाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून, केंद्र शासनाने या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 या योजनेमधून ग्लेन ओगल धरण देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तब्बल 7 कोटी 23 लाख रुपयांचा निधीस मान्यता मिळाली आहे.
अधिक वाचा : भाजप उमेदवाराविरोधात ठाकरे गटाचा आक्षेप, उमेदवारी रद्द करण्याची मागणी
या निधीमधून धरणातील गाळ काढणे, पिचिंग वॉल दुरुस्ती, संपूर्ण धरणास संरक्षक भिंत व किरकोळ दुरुस्तीसोबतच पर्यटकांसाठी उद्यान, बैठक व्यवस्था व पाण्यातील दोन कारंजे या प्रमुख कामांचा समावेश आहे. या कामांनंतर या धरणाची आज असलेली पाणी साठवण क्षमतेत एक हजार क्युबिक मीटरने वाढ होणार आहे. या सर्व कामाना राज्य शासनाच्या विशेष तांत्रिक समिती सह उच्च स्तरीय सनियंत्रण समितीने देखील परवानगी दिली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.