खासगी बसची ट्रकला धडक : गोव्यात वाढदिवस साजरा करून परतत असताना दुर्घटना
प्रतिनिधी/ .बेंगळूर
वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याला आलेल्या दोन कुटुंबातील सदस्यांपैकी 7 जणांचा बस अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. गुलबर्गा जिल्हय़ातील कमलापूर येथे शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली. बसमधील सर्वजण हैदराबादच्या सिकंदराबाद येथील रहिवासी आहेत. बसचालकाचा बेजबाबदारपणाच अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी या घटनेप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले आहे.
मृतांमध्ये अर्जुनकुमार (वय 37), त्यांची पत्नी सरलादेवी (वय 32), मुलगा भिवान (वय 4), दीक्षित (वय 9), अनिता राजू (वय 40), शिवकुमार (वय 35), रुवाली (वय 30) यांचा समावेश आहे. बसची ट्रकला धडक बसल्यानंतर बसने पेट घेतल्याने या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, इंजिनिअर अर्जुनकुमार आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन कुटुंबातील सदस्यांना घेऊन गोव्याला आले होते. गुरुवारी वाढदिवस साजरा केल्यानंतर रात्री ते सिकंदराबादला निघाले होते. शुक्रवारी पहाटे बिदर-श्रीरंगपट्टण मार्गावर कमलापूर येथे 6ः30 च्या सुमारास खासगी बसची हुमनाबादच्या दिशेने निघालेल्या ट्रकला धडक बसली. अपघातानंतर बस रस्त्याशेजारील संरक्षक कठडय़ाला आदळून खाली कोसळली. यावेळी बसच्या डिझेल टाकीला गळती होऊन आग लागली. परिणामी बसमधील 7 जणांचा मृत्यू झाला. सदर बस गोव्यातील ऑरेंज कंपनीची असल्याचे समजते. बसमधून 35 जण प्रवास करत होते.
आग लागल्याने स्थानिकांना बचावकार्यासाठी बसजवळ जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे स्थानिकांनी तातडीने अग्नीशमन दलाला याविषयी माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बस बेचिराख झाली. बसला आग लागल्यानंतर अनेक प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडून स्वतःचा बचाव करून घेतला. तर काही जणांना अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसमधून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या 12 जणांना गुलबर्गा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना कमलापूर येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ट्रकचालकाचे दोन्ही पाय धडावेगळे झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी गुलबर्गा जिल्हा पोलीसप्रमुख ईशा पंत, अतिरिक्त पोलीसप्रमुख प्रसन्न देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली.