जिल्हा निवडणूक विभागाने केली सोलापूर जिह्याकडे मागणी : जिह्यात सध्या 3001 ‘ईव्हीएम’ उपलब्ध
कोल्हापूर / प्रवीण देसाई
जिह्यातील 474 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. 18 डिसेंबरला 1985 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी 3740 ‘ईव्हीएम’ (मतदान यंत्रे) लागणार आहेत. परंतु जिल्हा निवडणूक विभागाकडे 3001 इतकीच ‘ईव्हीएम’ उपलब्ध आहेत. अजून 739 ‘ईव्हीएम’ लागणार आहेत. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने सोलापूर जिह्याकडे मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 474 सरपंच व 4402 सदस्य पदासाठी 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणेकडून युध्दपातळीवर तयारी सुरु आहे. यासाठी 1985 मतदान केंद्रे यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर 3740 ‘ईव्हीएम’ लागणार आहेत. ही संख्या 10 टक्के राखीवसह आहे. परंतु जिल्हा निवडणूक विभागाकडे 3001 ‘ईव्हीएम’च उपलब्ध आहेत. अजून 739 ची आवश्यकता आहे. तसेच मतदानासाठी 2799 कंट्रोल युनिट (सीयु) लागणार आहेत. यातील 2527 ‘सीयु’ निवडणूक विभागाकडे उपलब्ध असून ती सुस्थितीत आहेत. अजून 272 ची गरज आहे.
मशिनची कमतरता लक्षात घेऊन ती लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला कळवून याबाबत कल्पना दिली आहे. त्यावर आयोगाने कमी पडणारी ‘ईव्हीएम’ सोलापूर जिह्याकडून घ्यावीत असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने लेखी पत्राद्वारे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. त्याला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात ही ‘ईव्हीएम’ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे सोलापूरला जाऊन ही मशिन आणणार आहेत.