अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 11 ऑगस्ट 2021, सकाळी 9.30
● कराड, सातारा,फलटण, खटावचे आव्हान ● गत 24 तासात 622 नवे रूग्ण ● शाळांबाबत पालकांच्यात मतमतांतरे ● जितके बाधित त्या दुप्पट मुक्त
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख कायम असून, राज्यातील दहा हॉटस्पॉट जिल्ह्यात सातारा कायम आहे. जिल्ह्यात रूग्णवाढ अचानक उसळी घेत असली तरी कराड, सातारा, फलटण, खटाव या तालुक्यात रूग्णवाढ एकूण रूग्णवाढीच्या 75 टक्के असल्याचे आकडेवाडीवरून दिसते. कराड, सातारा तालुक्यातील आकडेवारी कायमच फुगलेली असून गेल्या महिन्यात फलटण, खटाव, कोरेगांव या तालुक्यातील वाढ कमी झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात या तालुक्यातही रूग्णवाढीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे रूग्णवाढ कमी करण्याचे आव्हान आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात 622 रूग्णांची नव्याने भर पडली असून 12 हजार 14 संशयितांच्या चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासातील जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.17 आहे.
चार तालुक्यांना सावरणार कसे?
जिल्ह्यात कराड तालुक्यातील रूग्णवाढ सर्वात कमी करण्यात एकदाही यश आलेले नाही. मंगळवारी आलेल्या अहवालात कराड 162, खटाव 131, फलटण 141, सातारा 141 अशी रूग्णवाढ झाली आहे. हा एका दिवसाचा अहवाल असला तरी दररोजच्या अहवालात अशीच परिस्थिती असल्याने या तालुक्यांना सावरण्याचे आव्हान आहे. इतर तालुक्यात रूग्णवाढ कमी झाली असली तरी ती कायमस्वरूपी नियंत्रणातच राहिल असे नियम राबवायला हवेत.
जितके बाधित त्या दुप्पट झाले मुक्त
बुधवारी जिल्ह्यात बाधित आकडा हा 622 इतका आला तर 1,208 जणांना मुक्त करण्यात आले, यामुळे उपचारार्थ रुग्णसंख्या कमी होऊन सरकारी शिथिलता मिळण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले जाते.
शाळांच्या निर्णयाकडे पालकवर्गाचे लक्ष
राज्यातील कोरोना रूग्ण नियंत्रणात आलेल्या 26 जिल्ह्यात 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित दहा जिल्ह्यातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. या दहामधे सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीची स्थिती पाहता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष आहे. कराडसारख्या तालुक्यात रूग्णवाढीवर नियंत्रण आणणे आव्हानात्मक बनले असताना शाळा सुरू झाल्यावर पाल्यांबाबत काय निर्णय घ्यायचा या संभ्रमात पालक आहेत. कारण यापुर्वी शाळा सुरू झाल्या होत्या मात्र मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बाधित आढळल्याने शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. त्यामुळे सर्वसमावेशक परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया पालक व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी बाधित 622, मुक्त 1,208, मृत 9
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत एकूण नमूने 15,14, 442, एकूण बाधित 2,26,728 घरी सोडण्यात आलेले 2,13,628 मृत्यू 5,473 उपचारार्थ रुग्ण 10,373