मुंबई/प्रतिनिधी
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावून आज ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान त्यांची अचानक तब्बेत खालावल्यानंतर ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होतील का नाही अशी शंका असताना खडसे यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, ईडी कार्यालयात दाखल होण्याआधी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी माझी ईडीने याआधी ५ वेळा चौकशी केली आहे. त्यामुळे ते माझी अजून किती वेळा चौकशी करणार असा प्रश्न उपस्थित केला.तसेच चौकशी दरम्यान ईडीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. परंतु जाणीवपूर्वक माझा छळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच ईडीच्या चौकशीच्या हेतूवरच माझा संशय असल्याचे खडसे यांनी म्हंटले आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना देखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना आज, सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्रकृती खालावली असल्याने आज होणारी खडसे यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६ मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. ईडीने समन्स बजावून आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक त्यांची प्रकती खालावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे ईडीसमोर हजर होण्यापूर्वी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. ही पत्रकार परिषदही रद्द झाली असून, प्रकृती ठीक नसल्याने खडसे चौकशीसाठी हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशी चर्चा सुरू होती.