नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभा सभागृहात अशोभनीय वर्तन केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांच्यावर शुक्रवारी सभापतींनी निलंबनाची कारवाई केली. पेगॅसस प्रकरणावर सभागृहात चर्चा सुरू असताना खासदार शंतनू सेन यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील निवेदनपत्र हातातून खेचून घेत फाडले होते. याप्रकरणी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शंतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शंतनू सेन अधिवेशनाला मुकणार आहेत.
‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला होता. याचदरम्यान केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निवेदनाचे कागद हिसकावून घेऊन ते उपसभापतींच्या आसनाकडे भिरकावण्यात आले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापतींच्या समोरील हौदात येऊन घोषणाबाजी केली. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे सुरक्षारक्षकांना मध्यस्थी करावी लागली. अशा प्रचंड गदारोळात मंत्र्यांचे निवेदन पूर्ण न होताच राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले होते. त्यानंतर आता दुसऱया दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली.