वार्ताहर/ बिबी
एकीकडे कोरोना विरुद्ध लढाई सुरू असताना दुसरीकडे समाजात माणुसकीला काळीमा फासणाऱया घटना घडत आहेत. झिरपवाडी (ता. फलटण) येथे एका नराधमाने दोन अल्पवयीन मुलींना भेळ खाण्याचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने यातील संशयित आरोपी धनंजय बाजीराव गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरपवाडी येथील धनंजय बाजीराव गायकवाड याने दि. 26 जुलै 2021 रोजी दुपारी 2 ते 2.15 वाजण्याच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. त्याने गावात राहत असलेल्या एका सात वर्षीय व चार वर्षीय बालिकांना गोड बोलून जवळ बोलावले. त्या दोन्ही बालिकांना गायकवाड याने तुम्हाला भेळ देतो असे सांगितले. त्या दोन्ही बालिकांना गायकवाडच्या मनातील काही कळू शकले नाही, त्या गायकवाड यांच्या घरात गेल्या. दुपारची वेळ असल्याने गावात वर्दळही कमी होती. नराधम गायकवाड याने या संधीचा फायदा घेत या दोन्ही बालिकांवर आळीपाळीने बलात्कार करत स्वतःची विकृती शमवली. घडलेल्या प्रकाराने दोन्ही बालिका घाबरून गेल्या होत्या त्यांनी हा प्रकार त्यांच्या घरच्यांना सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर बालिकांच्या नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गायकवाड याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून फलटण पोलिसांनी काही वेळातच त्याला जेरबंद केले.
आरोपी धनंजय गायकवाड याने दोन्ही मुलींची कपडे काढून, त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आहे. व सदर घटनेबाबत कोणाला काही सांगायचे नाही असा दम दिल्याने त्या दोन्ही बालिका प्रचंड घाबरलेल्या होत्या. या घटनेमुळे झिरपवाडी गावात वातावरण तणावग्रस्त झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने गावात बंदोबस्त तैनात करून आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे तणाव कमी झाला होता. मात्र या घटनेमुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत होता.
अधिक तपास पोलिस निरीक्षक भारत किंद्रे व सह तपासी अधिकारी म्हणून परिवेक्षाधिन महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे हे करत आहेत. आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.