सेन्सेक्स 872 अंकांनी तेजीत – निफ्टी 16,000 च्या वर
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही उच्चांकी टप्प्यावर राहिले आहेत. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स दिवसअखेर 872 अंकांनी मजबूत होत नवा विक्रमी नोंदवत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16,000 च्या वर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 872.73 अंकांसह 1.65 टक्क्यांच्या वाढीसोबत निर्देशांक 53,823.36 वर पोहोचत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 245.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,130.75 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्स जवळपास चार टक्क्यांच्या सर्वाधिक तेजीसोबत व्यवहार करत होता. टायटनचे समभाग अव्वल स्थानी राहिले होते. यासोबत एचडीएफसी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि भारती एअरटेल यांचीही कामगिरी मजबूत राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये बजाज ऑटो, टाटा स्टील आणि एनटीपीसी यांचे समभाग घसरणीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
जीएसटी-निर्यातीच्या आकडय़ांचा प्रभाव
देशातील जीएसटी संकलनांचे आकडे आणि मागील महिन्यातील निर्यातीची सकारात्मक स्थिती यामुळे मंगळवारच्या सत्रात भारतीय बाजारात मोठी उसळी नोंदवण्यात आली आहे. या कारणास्तव देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यात 280 अब्ज रुपयांचे भांडवल गुंतवले आहे. बाजारात प्रामुख्याने किरकोळ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. याच किरकोळ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसा लावला असून दुसऱया बाजूला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी याच दरम्यान 95 अब्ज रुपये बाजारातून काढले आहेत.
आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय, टोकीओ, हाँगकाँग नुकसानीत राहिले असून सिओल तेजीत राहिल्याचे दिसून आले. यामुळे आगामी काळात याच विदेशी बाजारातील कल देशातील बाजाराला कोणती स्थिती प्राप्त करुन देणार आहे, हे पाहणेच महत्वाचे ठरणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.