मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील व्यापाऱयांना करंट अकाऊंट बंद करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे नियम सदरच्या कालावधीनंतर अंमलात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून छोटय़ा व्यापाऱयांचे करंट अकाऊंट बंद करण्यात आल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून आले. याबाबत अनेकांनी विविध बँकांमध्ये आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या. कॅश क्रेडिट व ओव्हरड्राफ्ट सुविधा असलेल्यांचे करंट अकौंट मात्र सध्या बंदच होणार असल्याचे स्पष्टीकरण आरबीआयने दिले आहे. नव्या नियमांची अंमलबजावणी झाल्यानंतर करंट अकाऊंटऐवजी सर्व देवाण घेवाणीचे व्यवहार कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खात्याच्या अंतर्गत करता येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 31 ऑक्टोबरनंतर सदरचा नवा नियम अंमलात येणार आहे. रिझर्व्ह बँक सर्व करंट अकाऊंट, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टची सुविधा असलेल्या खात्यांचे नजर ठेवणार आहे.