वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा मुष्टीयोद्धा विकास कृष्णन याला पहिल्याच फेरीत खेळताना उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. उजव्या खांद्याचे हाड निसटल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दुखापतीमुळे विकास कृष्णनला आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुष्टीयुद्धापासून अलिप्त रहावे लागेल.
विकास कृष्णनने आतापर्यंत तीन ऑलिंपिक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. टोकियो ऑलिंपिकमध्ये झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत विकास कृष्णनच्या उजव्या खांद्याचे हाड निसटल्यानंतर तो अशा स्थितीमध्ये प्रतिस्पर्धी जपानच्या ओकाझेवा बरोबर एका हाताने लढत देत होता. मुंबईच्या प्रख्यात कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये प्रख्यात सर्जन दीनशॉ पर्डीवाला यांनी विकास कृष्णनवर शस्त्रक्रिया केली. यापूर्वी डॉक्टर पर्डीवाला यांनी बुमराह आणि श्रेयस अय्यर त्याचप्रमाणे सायना नेहवाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती.