वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या शिकागो महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सोमवारी अमेरिकेच्या माजी टॉप सीडेड आणि वयस्कर महिला टेनिसपटू व्हीनस विल्यम्सचे आव्हान पहिल्याच फेरीत तैवानच्या वेईने संपुष्टात आणले.
सातवेळा ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणाऱया 41 वर्षीय व्हीनसला पहिल्या फेरीत तैवानच्या वेईने 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 70 मिनिटाच्या कालावधीत पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती स्विटोलिनाने फ्रान्सच्या ब्युरेलचा पराभव केला. दुखापतीमुळे ब्युरेलने स्पर्धेतून माघार घेतली. पहिल्या फेरीतील दुसऱया एका सामन्यात म्लाडेनोव्हिकने दियासचा 6-2, 7-6 (7-3), मार्टिनकोव्हाने सिरेस्टीचा 3-6, 6-3, 6-2 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.