परराज्यातून येणाऱया विद्यार्थ्यांना सक्तीचा नसल्याचे स्पष्टीकरण : नवीन शिक्षण धोरणातील नियमाकडे कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱया पदवी महाविद्यालयांमध्ये 2021-22 पासून नूतन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱया विद्यार्थ्यांना कन्नड विषय सक्तीचा असणार नाही, असे कुलगुरु प्रा. रामचंद्रगौडा यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांमध्ये संभ्रम आहे.
कुलगुरुंनी सक्ती नाही असे म्हटले असले तरी आदेशामध्ये कन्नडसक्तीचा उल्लेख केला गेला आहे. याची कल्पना असणाऱया महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेवेळी कन्नडसक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे सीमाभागातील विद्यार्थ्यांना किंवा इतर राज्यातील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नसल्याचा स्पष्ट आदेश आरसीयुकडून आलेला नाही, असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मात्र संभ्रमात सापडले आहेत. सरकारच्या नूतन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या आवडीच्या कोणत्याही दोन भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे. हे धोरण कर्नाटकात जसेच्यातसे लागू करणे आवश्यक आहे. परंतु या नियमाकडे कानाडोळा केला जात आहे.
या संदर्भात कर्नाटक राज्य कॉलेज हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी स्पष्ट केले आहे की, बऱयाच कन्नड भाषिक विद्यार्थ्यांना इंग्रजी व हिंदी किंवा हिंदी आणि संस्कृत विषय घेण्याची इच्छा असते. त्यामुळे राज्यात कोणत्याच महाविद्यालयांसाठी कन्नड विषयाची सक्ती केली जाऊ नये.
सीमाभागातील मराठी संस्थांनी एकत्र येण्याची गरज
सीमाभागातील पदवी व पदव्युत्तर कॉलेजांमध्ये मराठी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे हे विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी मराठी विषय घेतात. परंतु नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्या विद्यार्थ्यांना कन्नड हा प्रथम विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. हे विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे ही सक्ती मागे घेऊन सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी भाषा ऐच्छीक ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांमधून होत आहे. बेळगाव शहरात मराठीसह उर्दू भाषिक शिक्षण संस्था आहेत. यामध्ये शेकडो विद्यार्थी दरवषी प्रवेश घेत असतात. या संस्थांनी आता एकत्रीत येवून या कन्नडसक्ती विरोधात शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून कन्नडसक्तीचा अट्टहास मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.