मोबाईल, टीव्ही, वृत्तपत्र, लॅपटॉपपासून राहणार दूर
जयपूर / वृत्तसंस्था
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी राजस्थानमध्ये दाखल झाले असून त्यांनी ध्यानसाधना सुरू केली आहे. इंडिगोच्या विमानाने जयपूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट विपश्यना केंद्र गाठले. ते जयपूरमधील गल्टा रोडवरील विपश्यना साधना केंद्रात पुढील 10 दिवस राहणार आहेत. ते येथे विपश्यना साधनेच्या वेगवेगळय़ा सत्रांना उपस्थित राहतील. यादरम्यान ते मोबाईल, टीव्ही, वर्तमानपत्र, लॅपटॉप आदींपासून पूर्णपणे दूर राहणार आहेत. तसेच कोणत्याही राजकीय कार्यक्रमातही भाग घेणार नाहीत. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱयापासूनही ते लांब राहणार आहेत.
जयपूरमधील विपश्यना साधना केंद्र हे राजस्थानमधील सर्वात जुने ध्यान केंद्र आहे. देशभरातून लोक येथे येतात. केजरीवाल यांनी यापूर्वीही विपश्यना ध्यान शिबिरांमध्ये अनेक वेळा हजेरी लावली आहे. मात्र, हय़ावेळी त्यांच्या जयपूरमध्ये येण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.