मनोज पवार/ दापोली
जैवविविधतेची मुक्तहस्ते उधळण झालेल्या दापोली तालुक्यातील विविध पठारे सध्या युट्रीक्युलरिया या मांसभक्षक वनस्पतींनी फुलून गेली आहेत. यामुळे कास पठारालादेखील लाजवेल, असा नजारा सध्या दापोलीतील निसर्गप्रेमी अनुभवत आहेत.
या वनस्पतींमध्ये फुलांच्या गुच्छाचा आकार हा 2 मि.मी. ते 19 सें.मी. रुंद असतो. त्याचे फुल असिमित ओठांच्या आकाराप्रमाणे असते. त्याच्या खालील पाकळ्या मोठय़ा आणि वरील पाकळ्या या छोटय़ा असतात. या वनस्पतींची फुले वेगवेगळ्या रंगांची असतात.
दापोली तालुक्याच्या दक्षिणेला असणाऱया विविध पठारांवर ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात फुलली आहे. यामुळे डोंगर व पठारावर निळी चादर ओढल्याचा भास होत आहे. आपल्या आकर्षक रंगामुळे कीटक व इतर छोटय़ा जीवांना आकर्षित करून घेणारी ही वनस्पती सध्या दापोलीतील निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांनादेखील आपल्याकडे आकर्षित करून घेत जगभरातील पर्यटक आकर्षित करण्याची ताकद असणारी युट्रीक्युलरिया ही किटाणूभक्षी वनस्पती आहे. या वनस्पतीला स्थानिक स्तरावर निळीपापणी म्हणून ओळखले जाते. या वनस्पती गोडय़ा पाण्यात आणि चिखलामध्ये आढळतात.
छोटय़ा किटाणूंचे करते भक्षण
या वनस्पतीच्या साधारणपणे 233 प्रजाती आहेत. युट्रीक्युलरिया ही वनस्पती छोटय़ा किटाणूंचे भक्षण करते. 0.2 मि.मी ते 1.2 सें.मी. एवढय़ा आकाराचे किटाणू ती खाते. या प्रजातीच्या वनस्पतींची किटाणू भक्षण करण्यासाठी मोठी पिशवी असते. या वनस्पती डासांच्या अळ्याही खातात. सपुष्प वनस्पतीसारखी मुळे, पाने, खोड हे स्पष्टपणे वेगळे करता येत नाही. या वनस्पतीमध्ये किटाणू पकडण्याचाठी पाण्याच्या पिशवीची एक अतिशय सुरेख रचना केलेली असते. ही पिशवी पारदर्शक असते. या पिशवीचा एक भाग वनस्पतीला जोडलेला व दुसरा भाग रिकामा असतो. काही भूभागावरील वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी पाने असतात. आहे.