प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे अर्थ व सामाजिक क्षेत्रातील कार्य स्पृहणीय व इतर संस्थांना प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. लोकमान्य सोसायटीच्या ‘लोकमान्य अर्थवार्ता विशेष अंकाचे’ प्रकाशन पुण्यामध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमान्य सोसायटी ग्राहक, सभासद, हितचिंतक यांच्यासाठी जे उपक्रम राबविते त्यातीलच अर्थवार्ता हा एक उपक्रम आहे. ही मासिक गृहपत्रिका आर्थिक घडामोडींचे वृत्त देणारी आहे. याप्रकाशनप्रसंगी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, अर्थवार्ताचे सल्लागार योगेश्वर गंधे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व संचालक संपादक श्रीराम पवार उपस्थित होते. किरण ठाकुर यांच्या हस्ते नितीन गडकरी तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.