‘रंगभूल’चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगभूल’ या निसर्ग चित्रांच्या प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. कोल्हापूर येथील चित्रकार एस. निंबाळकर व जयसिंगपूर येथील चित्रकार कविता चिकोडी यांच्या 60 हून अधिक चित्रांमधून निसर्गाचे सौंदर्य उलगडण्यात आले आहे. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला कोल्हापूर येथील चित्रकार चंद्रकांत जोशी, संगीतकार उमेश नेरकर, बेळगावचे चित्रकार किरण हणमशेट उपस्थित होते. प्रारंभी चित्रकार एस. निंबाळकर व कविता चिकोडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
उद्घाटनाप्रसंगी बोलताना किरण ठाकूर म्हणाले, के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून सर्वांना आपल्या कलांचे प्रदर्शन घडविता येणार आहे. परदेशाप्रमाणे आपल्या देशातही चित्रप्रदर्शने भरावित. कोल्हापूर व बेळगावचे जिव्हाळय़ाचे नाते असून कलेमध्येही येथे समन्वय आहे. त्यामुळे बेळगाचे कलाकार कोल्हापूर व कोल्हापूर येथील कलाकार बेळगावमध्ये आपल्या कलांचे सादरीकरण करतात असे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत जोशी म्हणाले, लहानपणापासून मुलांमध्ये चित्र पाहण्याचे संस्कार रूजविले पाहिजेत. आज चित्र सहसा कुणाला समजत नाहीत. चित्रकार त्यातून काय सांगतोय हे पहाणाऱयाला समजत नाही. हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी चित्रकलेला चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले. उमेश नेरकर म्हणाले, स्वरांना जशा भावना असतात तशाच चित्रांनाही भावना त्या फक्त ओळखता आल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
31 ऑक्टोंबर पर्यंत चित्रप्रदर्शन राहणार खुले
चित्रकार एस. निंबाळकर व कविता चिकोडी यांच्या चित्रांचे प्रदर्शन 31 ऑक्टोंबरपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 7 यावेळेत दुसरे रेल्वेगेट जवळील वरेरकर नाटय़संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन असणार आहे. एस. निंबाळकर यांची 30 तर कविता चिकोडी यांच्या 30 चित्रांचा यामध्ये समावेश आहे. प्रतिबिंब, कातळशिल्प, किल्ले, जुनी घरे, पठार, किल्ले अशा विविध चित्रे याठिकाणी पाहता येवू शकतात.