वृत्तसस्था/ नवी दिल्ली
जगातील मौल्यवान कंपनी होण्याचा मान मायक्रोसॉफ्टने नुकताच पटकावला आहे. पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने ऍपलच्या अग्रस्थानात घसरण झाल्याची बाब समोर आली आहे.
शुक्रवारी मायक्रोसॉफ्ट जगातील मौल्यवान कंपनी बनली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 2.49 ट्रिलीयन डॉलरवर पोहचलं आहे. तर दुसऱया नंबरवरील आयफोन निर्माती दिग्गज कंपनी ऍपलचे बाजार भांडवल 2.46 ट्रिलीयन डॉलरवर घसरले आहे. ऍपलचे चौथ्या तिमाहीचे नफ्याविषयीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत. त्यामुळेच कंपनीच्या अग्रस्थानाला धक्का बसल्याची बाब स्पष्ट केली जात आहे.
ऍपलचे समभाग घसरले
आयफोन निर्मितीतील दिग्गज कंपनी ऍपल सध्या अडचणीची वाट चालते आहे. ऍपलच्या समभागांच्या भावात शुक्रवारी 1.81 टक्के इतकी घसरण झाली व समभाग 149.81 डॉलरवर बंद झाला.
मायक्रोसॉफ्टचे समभाग वधारले
तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टच्या समभागांच्या भावाने मात्र चांगलीच उसळी घेतली. कंपनीचे समभाग 2.24 टक्के इतके वाढून 331.62 डॉलरवर बंद झाले होते.
दरम्यान चौथ्या तिमाहीत आयफोनची विक्री वर्षाच्या आधारावर पाहता 47 टक्के इतकी वाढली होती. पण तज्ञांच्या मते ही वाढ अपेक्षीत नाही. ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी, पुरवठा साखळी प्रभावीत झाल्याने 6 अब्ज डॉलर्सच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुरवठा साखळी आणखी प्रभावीत होण्याची शंका त्यांनी व्यक्त केली.