कुलगाममध्ये 2 चकमकीत 4 दहशतवादी ठार
कुलगाम / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी लष्कराने दोन वेगवेगळय़ा चकमकीत टीआरएफ कमांडरसह चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दोन्ही चकमक काश्मीरच्या कुलगाम जिल्हय़ात झाल्या. सायंकाळनंतरही या भागात चकमक सुरू होती. काश्मीर पोलिसांसह लष्करी जवानांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घालून दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसलेली दिसून येत होती.
कुलगामच्या पोंबई आणि गोपालपोरा या दोन भागात बुधवारी दहशतवाद्यांशी चकमक झडली. गुप्तचर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार सुरक्षा जवानांनी मोठय़ा फौजफाटय़ासह संशयितांच्या विरोधात शोधमोहीम राबविली. याचदरम्यान दोन ठिकाणी वेगवेगळी दोन शस्त्रसज्ज पथके रवाना करण्यात आली. यावेळी झालेल्या संघर्षात चौघांना यमसदनी पाठविण्यात सुरक्षा यंत्रणांना यश प्राप्त झाले. मारला गेलेला दहशतवादी अफाक सिकंदर हा ‘टीआरएफ’ या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी चार काश्मिरी ठार
यापूर्वी 15 नोव्हेंबरला श्रीनगरमधील हैदरपोरा येथे झालेल्या संघर्षात 4 काश्मिरी मारले गेले होते. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक हैदर असल्याचा दावा काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी केला होता. या कारवाईदरम्यान काश्मीरमधील दोन व्यावसायिकही मारले गेले. यामध्ये डॉ. मुदासीर गुल आणि अल्ताफ भट्ट यांचा मृतांमध्ये समावेश होता. येथील व्यापारी संकुलात त्यांची दुकाने होती. दंत शल्यचिकित्सक मुदासीर गुल हे या संकुलात संगणक केंद्र चालवत होते. तर अल्ताफ हा व्यापारी संकुलाचा मालक असून तो तेथे हार्डवेअर आणि सिमेंटचे दुकान चालवत होता.