बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप : कार्लसन जगज्जेतेपद राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी, आव्हानवीर नेपोम्नियाची मुसंडीसाठी सज्ज
वृत्तसंस्था /दुबई
1090 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आजपासून (शुक्रवार दि. 26) विद्यमान विश्वजेता मॅग्नस कार्लसन व रशियन आव्हानवीर इयान नेपोम्नियाची यांच्यात जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा खेळवली जाणार आहे. एकीकडे, नॉर्वेचा कार्लसन जेतेपद कायम राखण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर निर्जीव पटावरही विजयश्री खेचून आणण्यासाठी खास ओळखला जाणारा नेपोम्नियाची मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात असणार आहे. रशियन आव्हानवीर नेपोम्नियाचीला बुद्धिबळ वर्तुळात नेपो या टोपण नावाने संबोधले जाते.
पुढील 3 आठवडे चालणाऱया या स्पर्धेत एकूण 14 फेऱया होणार असून यात आज होणाऱया पहिल्या फेरीत नेपोम्नियाचीला पांढऱया मोहऱयांनी खेळण्याची संधी मिळणार आहे.
30 वर्षीय कार्लसन 2013 पासून बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियन ठरत आला आहे तर 31 वर्षीय नेपोम्नियाचीने एप्रिलमध्ये कँडिडेट्स टुर्नामेंट जिंकत या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता संपादन केली. कोव्हिड-19 मुळे तब्बल 13 महिने चाललेल्या कँडिडेट्स टुर्नामेंटमध्ये विजयश्री खेचून आणताना नेपोम्नियाचीचा संयम पणाला लागला होता. जागतिक मानांकन यादीत कार्लसन सध्या अव्वलस्थानी तर नेपोम्नियाची पाचव्या स्थानी विराजमान आहे.
कार्लसन व नेपोम्नियाची यांच्यात कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच अनेक लढती झाल्या असून यात बऱयाचदा कार्लसनने विजय संपादन केले आहेत. मात्र, आपल्या साहसी खेळाच्या बळावर नेपोने अलीकडील कालावधीत बरीच मुसंडी मारली असल्याने या पार्श्वभूमीवर येथील वर्ल्ड चॅम्पियनशिपबाबत बरीच उत्सुकता आहे.
नेपोम्नियाचीला पटावरील वेगवान, कौशल्यपूर्ण चाली रचण्यासाठी आणि धोकादायक पण, नियोजनबद्ध खेळासाठी खास ओळखले जाते. फिडे कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर नेपोने त्या यशाचे श्रेय मॉस्कोत स्थित स्कोल्कोव्हो इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटरमधील झोरेस या सुपरकॉम्प्युटरला दिले होते. फिडे रेटिंगमध्ये कार्लसनच्या 2855 गुणांच्या तुलनेत रशियन आव्हानवीर नेपो 73 अंकांनी मागे आहे.
यंदाच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत कार्लसन दावेदार असेल, तो उत्तम बहरात आहे. शिवाय, त्याने या स्पर्धेसाठी उत्तम तयारी देखील केली आहे. दुसरीकडे, नेपोला तयारीसाठी उत्तम अवधी लाभला असून त्यामुळे त्याचे मनोबल उंचावलेले असेल. जागतिक अजिंक्यपदाच्या फायनलमधील अनुभव नेपोसाठी विशेष महत्त्वाचा असणार आहे.
-भारताचा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद