प्रतिकूल खेळपट्टीवर 284 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना न्यूझीलंड दिवसअखेर 1 बाद 4
कानपूर / वृत्तसंस्था
पदार्पणवीर श्रेयस अय्यरने (125 चेंडूत 65) दडपणाखाली आपल्या आईस-कूल टेम्परामेंटची उत्तम प्रचिती देत वृद्धिमान साहाच्या (126 चेंडूत नाबाद 61) साथीने शानदार भागीदारी साकारल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या दिशेने भक्कम मोर्चेबांधणी केली. यजमान भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर जाहीर करत न्यूझीलंडला 284 धावांचे आव्हान दिले आणि रविवारी चौथ्या दिवसाच्या शेवटच्या 4 षटकात न्यूझीलंडला 4 धावांच्या बदल्यात पहिला गडी गमवावा लागला. यादरम्यान श्रेयस अय्यर पदार्पणाच्या कसोटीत शतक व अर्धशतक साजरे करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (1-3) विल यंगला बाद केले आणि याचवेळी तो भारतातर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱया गोलंदाजांमध्ये संयुक्त तिसऱया स्थानी पोहोचला. अश्विनच्या खात्यावर आता 417 बळी आहेत. येथे विल यंगला बाद करत त्याने हरभजन सिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
साहाची झुंजार फलंदाजी
तत्पूर्वी, पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यरने दुसऱया डावात अर्धशतक साजरे केले. वृद्धिमान साहाने मानेच्या दुखापतीने त्रस्त असताना देखील जिद्दीने फलंदाजी करत 126 चेंडूत नाबाद 61 धावांचे योगदान दिले. कारकिर्दीतील या 6 व्या अर्धशतकामुळे साहाच्या कसोटी कारकिर्दीला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अक्षर पटेल (नाबाद 28) व साहा यांची आठव्या गडय़ासाठी साकारलेली 67 धावांची भागीदारी भारतासाठी विशेष लक्षवेधी ठरली. या भागीदारीमुळेही हा सामना न्यूझीलंडच्या हातातून आणखी निसटत राहिला. न्यूझीलंडला या लढतीत थोडीफार आशाअपेक्षा असेल तर त्याचे श्रेय प्रामुख्याने टीम साऊदी (22-2-75-3) व काईल जेमिसन (17-6-40-3) यांना द्यावे लागेल. खेळपट्टीकडून काहीही मदत नसताना या उभयतांनी टिच्चून मारा केला.
हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे (15 चेंडूत 4 धावा) व उपकर्णधार चेतेश्वर पुजारा (33 चेंडूत 22) यांची अपयशी मालिका मात्र येथेही कायम राहिली. 1 बाद 14 वरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर आघाडीवीर स्वस्तात परतत राहिल्याने भारताची एकवेळ 5 बाद 51 अशी पडझड झाली. पण, श्रेयस अय्यर व साहा यांच्या योगदानामुळे संघाला वेळीच यातून सावरता आले. साहा एरवी साईड-ऑन स्टान्स घेतो. पण, येथे यात बदल करत त्याने ओपन-चेस्टेड स्टान्सवर भर दिला आणि हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडणारा ठरला.
284 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला प्रामुख्याने आघाडीवीरांवर आणि त्यातही कर्णधार केन विल्यम्सनवर सर्वस्वी अवलंबून रहावे लागेल, हे निश्चित आहे. अश्विन-अक्षर पटेल व जडेजा या फिरकी त्रिकुटाचा चक्रव्यूह न्यूझीलंड भेदू शकणार का, हे देखील दिवसभराच्या खेळात स्पष्ट होईल.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 345
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद 296
भारत दुसरा डाव (1 बाद 14 वरुन पुढे) ः मयांक अगरवाल झे. लॅथम, गो. साऊदी 17 (53 चेंडूत 3 चौकार), शुभमन गिल त्रि. गो. जेमिसन 1 (3 चेंडू), चेतेश्वर पुजारा झे. ब्लंडेल, गो. जेमिसन 22 (33 चेंडूत 3 चौकार), अजिंक्य रहाणे पायचीत गो. पटेल 4 (15 चेंडूत 1 चौकार), श्रेयस अय्यर झे. ब्लंडेल, गो. साऊदी 65 (125 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा पायचीत गो. साऊदी 0 (2 चेंडू), रविचंद्रन अश्विन त्रि. गो. जेमिसन 32 (62 चेंडूत 5 चौकार), वृद्धिमान साहा नाबाद 61 (126 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल नाबाद 28 (67 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 4. एकूण 81 षटकात 7 बाद 234 वर घोषित.
गडी बाद होण्याचा क्रम
1-2 (शुभमन, 1.1), 2-32 (पुजारा, 11.1), 3-41 (रहाणे, 14.5), 4-51 (मयांक, 19.2), 5-51 (रविंद्र जडेजा, 19.4), 6-103 (अश्विन, 39.2), 7-167 (श्रेयस, 60.2).
गोलंदाजी
टीम साऊदी 22-2-75-3, काईल जेमिसन 17-6-40-3, अक्षर पटेल 17-3-60-1, रचिन रविंद्र 9-3-17-0, विल्यम सॉमरव्हिले 16-2-38-0.
न्यूझीलंड दुसरा डाव (टार्गेट 284 धावा) ः टॉम लॅथम खेळत आहे 2 (13 चेंडू), विल यंग पायचीत गो. अश्विन 2 (6 चेंडू), विल्यम सॉमरव्हिले नाबाद 0 (5 चेंडू). एकूण 4 षटकात 1 बाद 4.
गडी बाद होण्याचा क्रम
1-3 (विल यंग, 2.6).
गोलंदाजी
रविचंद्रन अश्विन 2-0-3-1, अक्षर पटेल 2-1-1-0.
न्यूझीलंडचा संघ 34 वर्षांपूर्वीचा तो विक्रम मोडणार का?
भारतात विदेशी संघाने चौथ्या डावात सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम सध्या विंडीजच्या खात्यावर आहे. व्हिव रिचर्ड्सच्या नेतृत्वाखाली विंडीजने 1987 मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध 276 धावांचे लक्ष्य सर केले होते. आज न्यूझीलंडकडे तो विक्रम मागे टाकण्याची संधी असेल. अर्थात, खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक असल्याने आणि यापूर्वीच सलामीचा एक फलंदाज तंबूत परतला असल्याने न्यूझीलंडसाठी ही खऱया अर्थाने लिटमस टेस्ट असणार आहे.