प्रतिनिधी/ वाई
वाई शहर व परिसरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सतर्क करताच शाखेच्या जवानांनी अवघ्या चोवीस तासात चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन अल्पवयीन चोरटय़ांसह चारजणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 लाख रुपयांच्या 4 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
शाहरुख शरिफ बागवान(वय 28, रा. धर्मपूरी), विकास आनंदराव दळवी (वय 21, रा. चिखली) व दोन अल्पवयीन युवक अशी त्यांची नावे आहेत. वाई येथील मनोज लालचंद ओसवाल(रा. पतंगे हॉस्पिटल शेजारी) यांची डेस्टीनी एम. एच. 11 डी. ई. 1458 ही मोपेड दि. 26 रोजी तर रविवार पेठ वाई येथून दि. 24 रोजी दुपारी अजित रामचंद्र पंडित यांची श्रीराम सहनिवास अपार्टमेंटमधील पार्किंगमधून 50 हजार रुपयांची एम. एच. 11 बी. ख्यू. 4740 ही अज्ञात चोरटय़ांनी चोरुन नेल्या. यासह पंधरा दिवसांमध्ये दुचाकी चोरी गेल्याच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दुचाकी चोऱया रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दुचाकी चोरटय़ांचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. त्यांना खास खबऱयामार्फत माहिती मिळाली की चोरीची मोपेड घेवून अल्पवयीन युवक वाई शहरात फिरत आहे. सुझुकी ऍक्सेस क्र. एम. एच. 11 बी. क्यू. 4740 वरुन फिरताना तो आढळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे विचारपूस केली असता ती गाडी रविवार पेठ वाई येथील अपार्टमेंटमधील पार्किंगमून चोरल्याचे सांगितले. दोन्ही गाडय़ा ताब्यात घेतल्या. ही कारवाई सुरु असताना रात्री उशीरा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दुसऱया खास खबऱयामार्फत माहिती मिळाली की जैन मंदिरासमोरुन मस्ट्रो गाडी चोरीला गेलेली धर्मपुरी येथील एकाने चोरली आहे. त्यानंतर डीबी पथकाने त्या व्यक्तीचा शोध घेवून ती दुचाकी हस्तगत केली. आणखी एक बातमी पोलीस भरणे यांना मिळाली. त्यांनी पसरणी येथील एकाकडे चोरीची गाडी असल्याचे माहिती मिळताच डीबी पथकास त्यांनी सूचना दिल्या. पसरणी गावात शोध घेवून एमएच 11 बीजी 7469 ही दुचाकी ताब्यात घेतली. ती गाडी त्याला चिखली येथील व्यक्तीने दिल्याचे सांगितल्याने त्या व्यक्तीलाही पोलिसांनी पहाटे जेरबंद केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जान्हवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अनिल गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी सहभाग घेतला.