ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाच्या ओमिक्रॉन या धोकादायक व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहराने ओमिक्रॉनचा धसका घेतला आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताला होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 5 जानेवारी 2022 पर्यंत हा आदेश लागू असणार आहे.
लखनऊ प्रशासनाने लागू केलेल्या आदेशांनुसार मास्क विना कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, व्यायामशाळा, मैदाने यासारख्या ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. रात्री 10 नंतर शहरात लाऊडस्पीकर लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
विधानसभेच्या आसपास धरणे आंदोलनांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. ट्रक्टर ट्रॉली, घोडय़ांच्या गाडय़ा, बैलगाडी, ज्वलनशील साहित्य, सिलिंडर आणि शस्त्रे इत्यादींच्या वाहतुकीवरही बंदी असेल. छावणी क्षेत्र वगळता धार्मिक ठिकाणी 50 हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.