वृत्तसंस्था/ सिडनी
कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शॅपोव्हॅलोव्हने आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे जाहीर केले. एटीपी चषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो येथे आला आहे.
22 वर्षीय शॅपोव्हॅलोव्ह ऑस्ट्रेलियात दाखल झालेला पहिला विदेशी टेनिसपटू असून एटीपी चषक स्पर्धेत तो कॅनडा संघातून खेळणार आहे. ही स्पर्धा 1 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहे. गेल्या आठवडय़ात अबु धाबी येथे झालेल्या वर्ल्ड टेनिस चॅम्पियनशिप या प्रदर्शनीय स्पर्धेत तो सहभागी झाला होता. तेथे तिसऱया स्थानासाठी झालेल्या प्लेऑफ लढतीत त्याने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला होता. अबु धाबीतील स्पर्धेनंतर नदाललाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचप्रमाणे ऑलिम्पिक सुवर्णविजेती बेलिंडा बेन्सिक व टय़ुनिशियाची ऑन्स जेबॉर यांनाही लागण झाली होती. आपल्याला फक्त सौम्य लक्षणे दिसत असून सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचे शॅपोव्हॅलोव्हने सांगितले.