विलंबाच्या विचारसरणीवाल्यांमुळे हिमाचलने केली मोठी प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ मंडी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचल प्रदेशचा दौरा करत मंडी येथे जाहीरसभेला संबोधित केले आहे. मागील 4 वर्षांमध्ये हिमाचल प्रदेशात वेगाने विकास झाला आहे. राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होत रोजगारनिर्मिती झाली आहे. देशाच्या नागरिकांचे जीवन सुलभ करणे, ईज ऑफ लिव्हिंग ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. एक विलंबाची विचारसरणी तर एक विकासाची विचारसरणी आहे. विलंबाची विचारसरणी बाळगणाऱयांनी हिमाचलला विकासाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा करायला लावली. पण आमची प्रतिबद्धता केवळ विकासासाठी आहे, वेगवान विकासासाठी आहे. आम्ही केवळ महामार्ग आणि रेल्वेसुविधाच विकसित करत नसून दुर्गम गावांना रस्त्यांनी जोडत आहोत असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
काशीनंतर छोटी काशीमध्ये बाबा भूतनाथ, महामृत्युंजय यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. हिमाचलशी भावनात्मक नाते राहिले आहे. देशात दोन मॉडेल्स काम करत आहेत. एक सबका साथ, तर दुसरे स्वतःच्या परिवाराचा विकासाचे आहे. काँग्रेसशासित राज्यांमध्ये परिवारांचा विकास होतोय असे विधान मोदींनी केले ओ.
कोरोनावरील लस देण्याप्रकरणी हिमाचलप्रदेशने बाजी मारली आहे. हिमाचलचे सरकार स्वार्थाने नव्हे तर सेवेच्या भावनेतून काम करत आहे. दुर्गम क्षेत्रांमध्ये लस पोहोचविली, सरकार मुलींना मुलांइतकेच अधिकार देण्यावर काम करत आहे. मुलींच्या विवाहाचे वय देखील मुलांइतके करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विवाहाचे वय वाढल्याने मुलांना अधिक शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याचे मोदी म्हणाले.