व्हिएन्ना
जागतिक क्रमवारीतील 15 व्या मानांकित डॉमिनिक थिएमने पुढील महिन्यात होणाऱया ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली. 28 वर्षीय थिएमला मनगटाच्या दुखापतीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. त्याने आपल्या ट्वीटर हँडलवरुन या निर्णयाची घोषणा केली. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अर्जेन्टिनात होणाऱया कोर्डोबा ओपन स्पर्धेत आपण पुनरागमन करणार असल्याचे थिएमने ट्वीटमध्ये नमूद केले. यंदाची ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा दि. 17 जानेवारीपासून मेलबर्नमध्ये खेळवली जाणार आहे. थिएमने जूननंतर एकाही व्यावसायिक स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्याला मॅलोर्का चॅम्पियनशिपमध्ये ऍड्रियन मॅनॅरिनोविरुद्ध लढतीदरम्यान उजव्या मनगटाची दुखापत झाली होती. यापूर्वी अगदी अलीकडे त्याने एटीपी कप व सिडनी टेनिस क्लासिक स्पर्धेमधूनही माघार घेतली. एटीपी कपच्या तिसऱया आवृत्तीत तो ऑस्ट्रियन संघाचे नेतृत्व भूषवणे अपेक्षित होते.