बसला धडकला सिलिंडरने भरलेला ट्रक
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडच्या पाकुडमध्ये बुधवारी सकाळी एका भीषण रस्ते दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू ओढवला आहे. साहिबगंजपासून दुमका येथे येत जात असलेली बस गॅस सिलिंडरांची वाहतूक करत असलेल्या ट्रकला धडकली आहे. बसमधून 40 हून अधिक जण प्रवास करत होते. यातील सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 15 मृतदेह हस्तगत करण्यात आले असल्याचे पाकुडचे पोलीस अधीक्षक एच.पी. जनार्दन यांनी सांगितले आहे.
टक्कर अधिक भीषण असल्याने दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बसचा पत्रा कापून लोकांना बाहेर काढावे लागले आहे. मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. दुर्घटनेनंतर सर्वप्रथम स्थानिक लोकांनी मदतकार्य सुरू केले. धुक्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून 4 सदस्यीय पथक स्थापन करण्यात आले आहे.