लसीकरण मोहिमेला गती : टप्प्याटप्प्याने मिळणार तिसरा डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील विविध राज्यांमधील प्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्याधीग्रस्तांना सोमवारपासून तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली. आरोग्य आणि सुरक्षा कर्मचाऱयांबरोबरच पाच राज्यांमधील रणधुमाळीवेळी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱयांनाही प्रंटलाईन कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. देशात सुमारे 3 कोटी प्रंटलाईन कर्मचारी आणि आरोग्य सेवा कर्मचारी आहेत. या सर्वांना टप्प्याटप्प्याने तिसरा डोस दिला जाणार आहे.
कोरोना महामारीच्या तिसऱया लाटेत झपाटय़ाने रुग्णवाढ होऊ लागली आहे. सध्या देशात दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांना जास्त धोका असतो. त्यामुळेच 60 वर्षांवरील वृद्धांना डोस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. देशात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सुमारे 11 कोटी वृद्ध आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेवेळी तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन स्वतः आरोग्य केंद्रात उपस्थित होते, तर तेलंगणात आरोग्यमंत्री टी. हरिश राव उपस्थित होते.
बूस्टर डोस घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुकिंगसह लस केंद्रांवर बुकिंग देखील केले जाऊ शकते. मात्र, कोणत्या लसी केंद्रावर तुम्हाला खबरदारीचा डोस मिळेल, ही माहिती तुम्हाला कोविन ऍपवरच मिळेल. सावधगिरीचा डोस किंवा तिसरा डोस घेतल्यानंतर लाभार्थी प्रमाणपत्र आपोआप अपडेट केले जाणार आहे.
बूस्टर डोसही मोफत
सरकारी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. मात्र, खासगी रुग्णालये किंवा अन्य लसीकरण केंद्रांवर पैसे मोजावे लागतील. लाभार्थी आपल्या सोयीनुसार खासगी रुग्णालयातील केंद्रातही पैसे भरून तिसरा डोस घेऊ शकतात, असे सरकारने कळवले आहे. व्याधीग्रस्तांच्या लसीकरणानंतर 60 वर्षांवरील सर्वसामान्यांनाही लस दिली जाणार आहे.
3 मे पूर्वी दुसरा डोस घेतलेल्यांना ‘बूस्टर’
सध्या वयोवृद्धांना तिसरा डोस देण्यासाठी तीन अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत अन्य आजारांनी ग्रस्त असलेले 60 वर्षांवरील नागरिकच तिसरा डोस घेण्यास पात्र असणार आहेत. संबंधितांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. तसेच दुसरा डोस किमान 9 महिन्यांपूर्वी (37 आठवडे किंवा 273 दिवस) घेतलेला असावा. या अटीनुसार सध्या 3 मे रोजी किंवा त्यापूर्वी दुसरा डोस घेतलेल्यांनाच 31 जानेवारीपर्यंत बूस्टर डोस दिला जाणार आहे. या नियमावलीनुसार बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्यांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसही पाठवला जाणार आहे.