मडकई भाजपा उपाध्यक्षांची मागणी : भाजपा मडकईत चांगली कामगिरी करेल
वार्ताहर /मडकई
मडकई भाजपा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शेट हे पक्षासाठी ‘डिफेक्टीव फॅक्टर’ असून त्यांना पदावरून बाजूला हटविल्यास पक्ष मडकई मतदारसंघात निश्चितच चांगली कामगिरी करू शकतो. प्रदीप शेट हे पक्षासाठी स्वतः तर कार्य करीत नाहीतच उलट इतरांनाही काम करु देत नाहीत, असा सनसनाटी आरोप मडकई भाजपाचे उपाध्यक्ष सागर मुळवी यांनी केला आहे.
मडकई मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यासाठी मंडळामध्ये फेरफार करणे गरजेचे आहे. तशी कल्पनाही पक्षाच्या वरिष्ठांना दिलेली आहे. प्रदीप शेट यांना बाजूला हटविल्यास अनेक नवीन लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असे मुळवी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गेली काही वर्षे मडकईत भाजपाचे नेतृत्त्व प्रदीप शेट यांच्याकडे होते. या काळात त्यांनी पक्ष विस्तारासाठी कुठलेच प्रयत्न केले नाहीत. पक्षाच्या विविध समित्यांवर योग्य व्यक्ती नियुक्त करायला हव्या होत्या, तेही केलेले नाही. मडकई मतदारसंघात आजही भाजपाकडे मोठय़ा आशेने पाहणारा मोठा मतदारवर्ग आहे. मात्र प्रदीप शेट सारख्या लोकांमुळे तो पक्षापासून दुरावलेला आहे. मडकईत सुदेश भिंगी व डॉ. विद्या गावडे या दोघा उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्यासाठी काम करण्याची आमची तयारी आहे. मात्र डॉ. विद्या गावडे या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून मोठे पद सांभाळीत आहेत. त्यांनी तडजोड करावी, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सागर मुळवी म्हणाले. मगो-तृणमूल युती मडकईत लोकांच्या पसंतीस उतलेली नाही. काही महिन्यापूर्वीच गोव्यात प्रवेश केलेल्या तृणमूलने दादागिरी सुरु केली आहे. पैशांच्या जोरावर लोकांची मते व मने जिंकता येणार नाहीत. गेल्या दहा वर्षात भाजपाने जो विकास केला, कोरोना काळात जनतेला जी सेवा दिली, त्याची दखल घेऊन गोमंतकीय जनता भाजपालाच संधी देईल, असा दावाही त्यांनी केला. गेल्या 22 वर्षांमध्ये मडकई मतदारसंघात योग्य पद्धतीने विकास झालेला नाही. आरोग्य, शेती, रोजगार याकडे दुर्लक्ष झाल्याची टिकाही त्यांनी केली.