बेळगाव ः
कस्टम आणि महसूल विभागात उच्चपदावर असताना दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगावजवळील लोंढा येथील अजित विश्राम सावंत यांना ‘राष्ट्रपती उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. प्रजासत्ताकदिनी हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.
सध्या अजित सावंत हे डीजीजीआय, मुंबई येथे वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. इंटेलिजन्स इन्स्पेक्टरपदी असताना त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी भारतातील 28 जणांची निवड झाली असून त्यामध्ये अजित सावंत यांनाही बहुमान मिळाला आहे. लोंढा येथील अजित सावंत हे 1987 मध्ये केंद्रीय अबकारी खात्यात रुजू झाले. मुंबई येथे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. महसूल विभागाशी संबंधित अनेक घोटाळे, स्मगलिंग, कर चुकवेगिरी आणि जीएसटी फ्रॉड्सवर पाळत ठेऊन दोषींवर कारवाईही करण्याची जबाबदारी ते निभावत असून खात्यातील उच्चपदावर आहेत.