प्रतिनिधी / नागठाणे :
निगडी (ता.सातारा) येथील एका विहिरीमध्ये पडलेल्या सांबराला तब्बल ८ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. दरम्यान पायामध्ये शिकारीचा फासा लागून जखमी होऊन सांबर विहिरीत पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून उपचार केल्यानंतर त्याची सुखरूप सुटका केली असल्याची माहिती सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी निगडी येथील शिवारात असणाऱ्या एका विहिरीमध्ये सांबर पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी वनरक्षक राजू मोसलगी यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल २०० ते २२५ किलो वजनाचा नर जातीचा सांबर विहिरीत पडला असल्याचे लक्षात येताच वनविभागाने स्थानिक लोकांच्या मदतीने दोरखंड व जाळीचा वापर करून मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरा या सांबराला सुखरूपपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
सांबर अत्यंत घाबरलेल्या परिस्थितीत दिसून येत होते. त्याच्या अंगावर उबदार कपडे टाकून त्याला शांत करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या मागील उजव्या पायात शिकारीसाठी वापरण्यात येणारा फासा अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्याच्या पायातील फासा काढून टाकला.यावेळी त्याचा जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आणि त्याचा थकवा दूर करण्याकरिता इतर उपचार करण्यात आले. प्रथमोपचार करताच सांबर बऱ्यापैकी सावरले. तदनंतर त्याची सुटका करण्यात आली.