सेन्सेक्स निर्देशांकात 695 अंकांची वाढ, बजाज फिनसर्व्ह नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजार अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दुसऱया दिवशीही तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. जागतिक बाजारातील सकारात्मकता तसेच बँकिंग व वित्तसंबंधीत कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर बाजार सकारात्मक कल दर्शवत बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक बुधवारी आठवडय़ाच्या तिसऱया दिवशी 695 अंकांच्या वाढीसह 59,558 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 203 अंकांच्या तेजीसह 17,780 अंकांवर बंद झाला. बुधवारी सेन्सेक्स सकाळी 431 अंकांच्या वाढीसह 59,293 अंकांवर खुला झाला होता. दिवसभरात एकावेळी सेन्सेक्सने 59,618 अंकांचा स्तरही गाठला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग तेजीसह तर 8 घसरणीसह बंद झाले होते. यामध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक 5 टक्के इतके वाढले होते. याशिवाय कोटक बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि एचडीएफसी बँकचे समभागही तेजीसह बंद झाले आहेत. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, टायटन, एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज, डॉ. रेड्डिज लॅब्ज आणि टीसीएस यांचे समभागही वाढीसह बंद झाले. घसरणीमध्ये मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, महिंद्रा आणि महिंद्रा आणि सन फार्मा यांचा समावेश होता. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 270.75 लाख कोटींवर पोहचले होते. दरम्यान दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे समभाग बुधवारी 6.64 टक्के इतके वाढलेले दिसले. नायकाचे समभागही 6.90 टक्के आणि झोमॅटोचे समभाग 4.6 टक्के वाढीसह बंद झाल्याचे दिसले. निफ्टीत 40 समभाग तेजीसह बंद झाले होते. दुसरीकडे आशियातील इतर बाजारांमध्ये जपानचा निक्की लाभात राहिला होता. तर चीन, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचे बाजार मात्र बुधवारी बंद होते. युरोपच्या बाजारात दुपारच्या सत्रात तेजी दिसली होती.