दबंग दिल्लीची बेंगळूर बुल्सवर मात, पाटणा पायरेट्स विक्रमी चौथ्यांदा फायनलमध्ये, उद्या होणार जेतेपदाचा फैसला
बेंगळूर / वृत्तसंस्था
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पाटणा पायरेट्स व दबंग दिल्ली संघांनी उपांत्य फेरीत धडाकेबाज विजय संपादन करत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. दिवसातील पहिल्या उपांत्य लढतीत पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाला 38-27 अशा फरकाने नमवले तर दुसऱया उपांत्य लढतीत दबंग दिल्ली संघाने बेंगळूर बुल्सला 40-35 अशा फरकाने मात दिली.
पाटणाने यूपी योद्धाला नमवताना जोरदार वर्चस्व गाजवले. त्या तुलनेत दबंग-बेंगळूर यांच्यात थोडाफार संघर्ष रंगला. आश्चर्य म्हणजे पाटणा पायरेट्सने यापूर्वी 3 वेळा फायनलमध्ये धडक मारली असून प्रत्येक वेळी त्यांनी जेतेपद देखील काबीज केले. तोच धडाका यंदा ते चौथ्यांदा कायम राखू शकणार का, हे उद्या होणाऱया फायनलमध्ये स्पष्ट होईल.
पाटणा पायरेट्सची एकतर्फी बाजी
बुधवारी पहिल्या उपांत्य लढतीत पाटणा पायरेट्सने यूपी योद्धा संघाचा 38-27 अशा फरकाने एकतर्फी पाडाव करत अंतिम फेरीत थाटात आगेकूच केली. पाटणाने पहिल्या सत्रात 23-9 अशी 14 गुणांची आघाडी घेतली होती. ती त्यांनी दुसऱया सत्राअखेरही 11 गुणांनी कायम राखली आणि सहज विजय मिळवला.
यूपी योद्धाने नाणेफेक जिंकल्यानंतर पाटणा पायरेट्सला प्रथम रेड करण्याचे निमंत्रण दिले आणि पहिल्या काही चालीनंतर पाटणाने वर्चस्वाची मालिका सुरु केली. मोहम्मदरझाने सुरेंदर गिलला टॅकल करत संघाचे खाते उघडले. सचिनने प्रदीप नरवालला टॅकल करत पाटणाची आघाडी 4-0 अशी भक्कम केली. आशू सिंगने सुपर टॅकलवर यूपी योद्धाला पहिला गुण मिळवून दिला. रेड करण्याच्या आघाडीवर श्रीकांत जाधवने योद्धाचे खाते उघडले.
पाटणा पायरेट्सने यूपी योद्धाच्या प्रदीप नरवालवर सातत्याने दडपण राखले आणि हेच या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. सचिन, गुमान व प्रशांत या रायडर्सनी 10 गुणांची कमाई करत पाटणाच्या एककलमी वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. दुसऱया सत्रात यूपीने थोडाफार प्रतिकार जरुर केला. पण, ते पाटणाचे वर्चस्व मोडीत काढू शकले नाहीत.