प्रतिनिधी/ मडगाव
खारेबांद मडगाव येथे शनिवारी दुपारी एका कारला आग लागली.
प्राप्त माहितीनुसार खारेबांद- उड्ढाण पूल या रस्त्यावर ही घटना घडली. ही कार चालत असताना अकस्मात बंद पडली. कार चालक ती कार सुरु करण्याचा प्रयत्न करीत असताना अकस्मात कारमधून धूर येऊ लागला. कारमधून धूर येत असल्याचे पाहून कार चालक बाहेर आला आणि पाहणी करु लागला तोच कारने पेट घेतला.
कारने पेट घेतल्याचे पाहून या घटनेची मडगावच्या अग्नी शमन दलाला कल्पना देण्यात आली. मात्र दलाचे जवान काही वेळेवर पोहोचू शकले नाहीत. परिणामी स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
चौकशी केली तेव्हा असे समजले की उड्ढाण पुलावर दुरुस्ती काम चालू असल्यामुळे वाहतूक एकतर्फी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच पाणी घेऊन येणारी अग्नी शमन दलाची गाडी अडकली होती. त्यामुळे जवान वेळेवर पोहोचू शकले नव्हते. मात्र, त्यानंतर दलाच्या जवानानी आग पूर्णपणे विझवली अशी सुत्रानी माहिती दिली.
आग कशी लागली व आगीत कितीची हानी झाली ते लगेचच कळू शकले नाही.